पुस्तक रसग्रहण - हॉररस्टोर: लेखक ग्रेडी हॅन्ड्रिक्स
IKEA ह्या दुकानाचं नाव बऱ्याच लोकांना माहिती असेल. विविध फर्निचर,घरात लागणाऱ्या वस्तू, "Do it yourself" ("DIY") तत्वानुसार असलेल्या वस्तू वगैरे विविध प्रकार IKEAत बघायला मिळतात. हि प्रचंड मोठी दुकानं भारत सध्याचं आली असली तरी पाश्चिमात्य संस्कृतीत मोठ्या प्रमाणावर रुजलेली आहेत. रोजगार निर्मितीची अवाढव्य क्षमता, त्यांच्या मागे असलेली प्रचंड भांडवली शक्ती, त्यांची आकर्षक माहितीपुस्तकं (ब्रोशर्स) ह्यावरून कोणाला हॉरर कादंबरी सुचणचं मनोरंजक आहे. हे वस्तुतः ग्राफिक नॉवेल, म्हणजे सचित्र पुस्तक, IKEAच्या ब्रोशर सारखी मांडणी म्हणून ते ऑडिओबुक रूपात ऐकताना थोडा साशंक होतो. पण ह्या ऑडिओबुक बरोबर पुस्तकं सुद्धा मिळाल्याने चित्र पण बघता आली.
गोष्ट IKEA सारख्या असणाऱ्या ORSK ह्या अतिप्रचंड दुकानात घडते. बेसिलह्या बॉसच्या सांगण्यावरून एमी आणि रूथ ऍन ह्या दोन महिला कर्मचारी रात्रपाळी साठी दुकानात थांबतात आणि कथेला सुरवात होते. हॉररकॉमेडी ह्या कथाप्रकारात मोडणाऱ्या ह्या कथेचे पैलू हळू हळू उलगडत जातात. बेसिलने त्यांना दुकानात रात्री होणाऱ्या संशयास्पद हालचालीवर देखरेख करायचं काम देतो. दुकानात भूत आहे असा संशय येऊन. त्याचा छडा लावायला अजून दोन कर्मचारी दुकानात येतात. हे सगळे मिळून दुकानात रात्रीचा पहारा देताना त्यांना दुकानात लपून राहून आपला संसार थाटलेला एक निर्वासित भेटतो आणि एका मागून एक गूढ गोष्टी घडत जातात.
खरं तर एका रात्रीत, मर्यादित व्यक्तिरेखांना घेऊन लिहलेल्या गोष्टीतत तोच तोच पणा येण्याची आणि उगाचच अतीवर्णन करण्याची शक्यता असते. ह्यात लेखकाने हे सगळं टाळलं आहे. हॉरर लिहताना त्यात नर्म विनोद सुद्धा आहे आणि भडकपणा नाही. कॉर्पोरेट संस्कृती आणि माणसाला झपाटून टाकणारी भुतं, कंपन्यांच्या जनसंपर्क विभागांचं डॅमेज कंट्रोल, फर्निचरच्या दुकानात असलेल्या विक्षिप्त वस्तू आणि त्यांचं अतर्क्य लॉजिक हे धमाल आहे. त्याच बरोबर २१व्या शतकात असलेली नरकाची संकल्पना म्हणजे संधीचा अभाव, नफेखोरी आणि मागच्या शतकातली नरकाची संकल्पना म्हणजे वेगळेपणाची भीती, ह्या गोष्टींवर भयकथा लिहताना सुद्धा सटल भाष्य केलं आहे. हॉरर म्हणजे रक्त, किंचाळणारे लोक वगैरे कल्पना सोडून बदलती जीवनशैली आणि भीती ह्यांची सांगड घालून गोष्ट संपते.
लेखक ग्रेडी हॅन्ड्रिक्स हा पत्रकार आणि पटकथाकार असल्याने त्याने बऱ्याच गोष्टी वेगळ्या नजरेने मांडल्या आहेत. मी सध्या लॉकडाऊन मध्ये बरीच पुस्तकं वाचली पण खास ह्या पुस्तकावर लिहावंसं वाटलं कारण ह्यात असलेला फ्रेश थॉट. एखाद्मा दुकानाच्या माहिती पत्रिकेच्या रूपात पुस्तक छापणं मोठं रिस्की काम कारण, अर्धी लोकं ते पुस्तक जाहिरात समजून बाजूला ठेवतील कि काय इथं पासून सुरवात. आधी ग्रेडी हॅन्ड्रिक्स साधारण झपाटलेल्या घराची वगैरे गोष्ट लिहून ती त्याच्या संपादकांनी दिली, ती त्यांनी नाकारली आणि त्याला एखाद्या रिटेल दुकानात अशी कथा घडली तर काय असा विचार करून लिहायला सांगितलं. हे पुस्तक डिझाईन करताना IKEA चा लूक देण्याचं कारण म्हणजे सध्याच्या डिजिटल युगात वाचकांनी फिजिकल पुस्तकं घ्यायला भाग पडायचं असेल तर पुस्तक निर्मितीत काही प्रयन्त करणं गरजेचं आहे असं त्याला वाटतं. लवकरच ह्यावर एक चित्रपट सुद्धा येणार असं वाचलं, तो सुद्धा ह्याच दर्जचा असू दे हीच इच्छा.
- निनाद खारकर
Comments
Post a Comment