Birds, Beasts and Bandits: 14 Days with Veerappan

 Birds, Beasts and Bandits: 14 Days with Veerappan हे पुस्तक ऑडिबलवर नुकतंच ऐकून झालं. प्राण्यांवर डॉक्युमेंटरी करायला गेलेल्या काही व्यक्तींना वीरप्पन ताब्यात घेतो आणि १४ दिवस त्याच्या बरोबर ठेवतो अशी साधारण गोष्ट. ह्या पुस्तकात एक किस्सा आहे, ज्यांचं अपहरण झालं होतं ते लोक सुटका होऊन त्यांच्या आऊटहाऊसवर पोहोचतात आणि तिकडे पडलेलं वर्तमानपत्र हातात घेतात. त्यात आलेल्या बातमीनुसार त्यांच अपहरण, चकमकी, सुटका ह्यांचं रंगतदार वर्णन असतं. प्रत्यक्षात तसं काहीही झालं नसताना आणि मीडियाचा कोणताही वार्ताहर संपर्कात नसताना हे छापून कसं आलं हा प्रश्न पडतो. बातमीमूल्य वाढवणाऱ्या घटना, मसाला लावून सांगणं म्हणजे काय ह्याचा त्यांना प्रत्यक्षदर्शी अनुभव आला. सध्याच्या सुशांतसिंग राजपूत केस मध्ये अगदी खाजगी घटना, खासगी संदेश, लीक होणाऱ्या गोष्टी वाचून मीडियामधले लोकच त्यांची क्रिएटिव्हिटी वापरात असतील ह्याचा प्रत्यय येतोय. राजकारण्यांना दुसऱ्या पक्षातील लोकांना अडचणीत आणायला आणि माध्यमांत काम करणाऱ्या लोकांची व मीडियाच्या ग्राहकांची विचार करण्याची कुवत नसल्याने, सध्या हा तमाशा रोज बघायला मिळतो. ह्या पुस्तकात अगदी आतासारखा किस्सा वाचायला मिळाला म्हणून गंमत वाटली.

Comments