“कोवळे दिवस"-व्यंकटेश माडगूळकर, एक अस्वस्थ अनुभव

आपल्याकडे आत्मचरित्र वगैरे लिहिताना आपण कसे स्थितप्रज्ञ आणि बाकीचे कसे रस्खलानशील हे दाखवण्याची सवय आहे. स्वतःविषयी लिहिताना त्या मध्ये कथा गुंफून कादंबरीचे रूप देणे विरळा. ह्या सर्व आधुनिक आणि उत्तर आधुनिक तंत्रांचा खुबीने वापर करून अभिजात कलाकृती निर्माण करणारे व्यंकटेश माडगूळकर ह्यांची “कोवळे दिवस” हि स्वकथन वजा कादंबरी नुकतीच वाचनात आली त्या निमित्ताने थोडेशी खर्डेघाशी.

व्यंकटेश माडगूळकर हयांच लेखन वाइन सारखं आहे; चढ़त नाही, पिनारया ची चवं सुधारून जातं. जेवढ़ं जुनं, तेवढ अजुन गहिर होणारं. माडगूळकरां सारखं परिस्थिती अणि तीने निर्माण केलेले प्रश्न सूक्ष्म अणि तरल दाखवणं कठीण आहे. विकीपिडियाच्या माडगूळकरांच्या लेखात असलेला त्यांचा जीवनपट आणि “कोवळे दिवस” ह्या कादंबरीत येणारे वर्णन बऱ्याच अंशी सामायिक आहे; त्या मुळे हे त्यांचे स्व-कथन आहे हे मानण्यास थोडा का होई ना वाव आहे. कादंबरीचा नायक राजा, स्वातंत्र्य पूर्वी दहा-पंधरा वर्षे आधीच्या तरुणाईचे प्रतिनिधित्व करतो. लहान वयातच हा क्रांतीची आणि स्वातंत्र्याची आशावादी स्वप्ने घेवून बहार पडलाय आणि कट झाल्यावर आता भूमिगत देखील झालाय. समाजातील तथाकथित उच्चवर्गातून आलेला राजा भूमिगत होवून त्याच्या गावी आला आहे. त्याचं गाव संस्थानात मोडत असल्या मुळे पकडला जाण्याची टांगती तलवार म्हणावी तेवढी धारदार नाही. गावात करण्यासारखं काही नसल्या मुळे रोज गायीला चाऱ्याला घेवून जाणे आणि कोणेकाळी शिकलेली चित्रकला कॅनवास वर उतरवणे हेच काम आहे. मोकळ्या कुराणान वर गायीला मोकळं सोडून वर निळ्या आकाशा खाली त्याचं विचारविश्व भिरभिरत; त्याला त्याच्या आंदोलना च्या काळात घेवून जातं, दुसऱ्या महायुद्धा च्या वेळी सैन्यात भारती होण्या साठी केलेला प्रयत्न, रामोशी मुलां बरोबर जंगलात केलेली मस्ती, त्याची बालमैत्रीण यमु सगळं.
राजा परत आला आहे तेव्हा गाव बदललय, त्याच्या बरोबर चे काम करणारे बाप्ये झालेत. त्याचीही दृष्टी बदलली आहे. अश्यावेळी एकलकोंडा आणि भूमिगत झालेला आपला नायक चित्रकला आणि चिंतन ह्या दोनच गोष्टी करतो. यमु बद्दल त्याला सुप्त आकर्षण आहे पण त्याने ते मैत्री च्या पातळी वरच ठेवले आहे. राजा ला चळवळीच्या कामा साठी गाव सोडावं लागतं; दरम्यानच्या काळात त्याची गायही हरवते आणि यमुही. मजल दर मजल करत राजा नव्याने वसवलेल्या उद्योग नगरातल्या प्रेस मध्ये चित्रकाराची नोकरी स्वीकारतो. तिथे स्नेह्यांच्या घरात राहताना राजा ला घरात नुकतीच आलेली यजमानाच्या बायको ची बहिण, उमा आवडते. तिला मॉडेल म्हणून चित्र काढता, काढता दोघांचे बंध जुळतात पण एकदा प्रणय प्रसंगी रंगे हात पकडल्या नंतर राजा ला हाकलून देण्यात येत. नोकरी सोडून राजाला शहर सोडून जावं लागतं. Warrant असलेला राजा पोलिसांकडे अटक होण्या साठी जातो तर तो पर्यंत कटामधील लोकांना सोडण्याचं फर्मान निघालेलं असत. स्वतंत्र मिळूनही असहाय, अगतिक झालेला राजा नोकरीच्या शोधात मुंबई ला गर्दी चा एक भाग बनून जातो, चित्रकलेचा ब्रश सोडून पेन घेवून शब्दांचा चित्रकार होतो आणि आठवणींवर खपली चढवत लिहिती राहतो.

वर वर भंपक आणि सवंग लोकप्रिय वाटणारी गोष्ट माडगूळकर ह्यांच्या सामाजिक भान आणि माणूस ओळखण्यची कला ह्या मुळे गहिरी झाली आहे. क्रांतिकारकांचे सामाजिक रूप दाखवताना कौटुंबिक, व्यक्तिगत अधिक स्पष्ट बोलायचं झालं तर लैंगिक आकर्षण ह्या घटकांवर जास्त बोललं अथवा लिहिलं जात नाही. कार्यकर्ता हा देखील माणूसच असतो पण आपण इतिहासबाजी, राष्ट्रपुरुष ह्या सारख्या संकल्पना, गोड झापडं लावून माणूस समजण्याचे बाकीचे दरवाजे बंद करतो. असं करून आपण कोणते संस्कृतिरक्षण करतोय? सत्याचे कि ढोंगीपणाचे? राजा ची यमु बद्दलची ओढ, उमा बरोबरचे संबंध व्यक्तिरेखेच्या आवाक्यानुसार आले आहेत. कथे मध्ये नाना पाटील आणि त्यांचे पत्री सरकार, क्रांतीकारांच्या टोळ्या उल्लेख वेळोवेळी येतो. वाचनाची आवड असलेल्या राजाला स्वताची वैचारिक चौकट आहे, त्या चौकटी मध्ये राहून विचार करण्याकडे मग भलेही ते व्यवस्थेच्या विरुद्ध का असेना करण्याची प्रवृत्ती वेळोवेळी योग्य प्रसंगांनी दाखवली आहे. (उदाहरणार्थ, पत्री सरकार च्या लोकांना,` तुम्ही विहीरी का खणत नाही? विचारणे, आपण क्रांतिकारक आहोत ह्याचा जरा सुद्धा पत्ता उमाला लागू न देण, इत्यादी इत्यादी.) कथेत आलेली माणसं, त्यांचे वाक्यप्रचार, हेल, स्वतःविषयीच्या कल्पना १९३०-१९४० मधल्याकाळातीलच वाटतात. जातींचे आणि त्यांच्या व्यवसायांचे संदर्भ राजाच्या स्वागता मध्ये बेमालूम पणे येतात. लेखक म्हणून बदलत जाणारी राजाची नजर आणि त्याला कारणीभूत असलेल्या घटना ह्यांची सांगड उत्तम घातली आहे. आधी असलेला आदर्शवाद आणि खऱ्याखुऱ्या चळवळीच्या काळात येणारे प्रश्न आणि भविष्याची चिंता ह्या सर्व परिस्थितीच्या फ्रेम मध्ये आपला नायक उभा राहतो, लेखक होतो, क्रांतीचा जल्लोष संपतो आणि उरते फक्त राहून गेलेल्या प्रेमाची आठवण, ताजी आणि दुखणारी.

व्यंकटेश माडगूळकर ह्यांची “कोवळे दिवस” हि कादंबरी अभिजात आणि मराठी माती प्रमाणे अस्सल आहे ह्यात शंकाच नाही. जो पर्यंत राज्यक्रांत्या होत राहतील, समाज व्यवस्था आणि ती बदलण्याची स्वप्न पाहणारे आणि ते रोखण्यासाठी जीवाचा आटापिटा करणारे सनातनी हे सर्व घटक राजा सारख्या अनेकांच्या कोवळ्या दिवसांचे मध्यस्त आणि साक्षीदार असतील.
- निनाद खारकर

खाली संबंधित लिंक्स आहेत, जरूर बघाव्या.

Comments

  1. khupch chaan Blog lihila aahe. ani tu kharokhar mandla aahes ki rajya sarkhe kovalya divasachi madhyastha ani shaakshidaar aanekanchya maant aste.......

    ReplyDelete

Post a Comment

Popular Posts