रमेश समर्थ


रमेश समर्थ माझे लांबचे मामा. गोवा मुक्ती संग्राम, जॉर्ज फर्नांडिस ह्यांची कामगार चळवळ, शब्द मासिक ते लिटिल मॅगझीन ह्या साहित्य चळवळी असा त्यांचा मुक्त संचार होता. इतके कलागुण असून स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिळणारी पेन्शन हा इतकाच उत्पन्नाचा स्त्रोत शेवट पर्यंत असा माझा अंदाज आहे. अभ्यासू कार्यकर्ता हा ६०-७०च्या दशकात आढळणाऱ्या प्राण्याचे ते वंशज वाटतात. सध्याच्या सगळ्यांना सगळं माहिती असणाऱ्या युगात विद्वत्तापूर्ण लिहणारे फार कमी आढळतात. फर्नांडिस आता हयात असून लोकांच्या विस्मरणात गेलेत तर त्यांच्या कार्यकर्त्यांना कोण ओळखणार?
रमेशमामा हयात होते तेव्हा कधी त्यांची आणि माझी भेट झाली नाही. त्यांचं निधन झालं तेव्हा चिक्कार पाऊस होता, नंतर चाळीतल्या त्यांच्या घरी सामानाची आवरा आवर सुरू होती. त्यांचं लिखाण, टिपणं, प्रकाशित साहित्य ठेवायला जागा नव्हती म्हणून आमच्या घरी आणली. आईने सांगितलं,"तुला वाचायची आवड आहे तर बघ चाळून." मला वाटलं ते हौशी लेखक असतील म्हणून सहज एक त्यांची डायरी घेतली चाळायला. एकाचवेळी ज्ञानेश्वर, फ़्रेंच राज्यक्रांती वगैरे संदर्भ आल्यावर मात्र चाचपलो. त्यांचं लिखाण मला वेगळं आहे हे जाणवायला लागलं. वाचत गेलो तसं अजून आवडत गेलं. भौतिक जगण्यात आलेले अनुभव आणि त्याला दिलेली अध्यात्माची जोड हा प्रकार मला त्यांच्या लिखाणात खूप आढळला.
विंदा करंदीकर, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ ह्या त्यांच्या मित्रमंडळींची ओळख मला त्यांच्या टिपणांतून झाली. रमेशमामांची प्रतिभा मला त्याच तोडीची वाटली. मागे The Wire ह्या इंग्रजी पोर्टलवर अंजली नर्लेकर ह्या रोटजर्स विद्यापीठात प्राध्यापकांनी ह्यांनी How Little Magazine Broke Through Language Barrier ह्या लेखात रमेशमामांचा ओझरता का होईलना उल्लेख केला होता. ह्या लेखात रमेशमामांनी शब्द हा मासिकासाठी केलेल्या कामाचा उल्लेख होता.
अध्यात्म ते समाजवाद अश्या चतुरस्त्र विषयांवरचं त्यांचं लिखाण अचंबित करणारं आहे. काही लिहायला नसेल तर दैनंदिन घडामोडी त्यांच्या डायरीत सापडल्या.आज आवराआवर करताना रमेशमामाचं हे पुस्तक सापडलं. हे पुस्तक आधी 'लखलखणारी भाकरी' ह्या नावाने प्रकाशित झालेलं होतं नंतर 'प्रवासी क्षण' ह्या नावाने प्रकाशित झालं. नामदेव ढसाळ, अरुण पाटील, अशोल नायगावकर ह्या रमेशमामांच्या मित्रांना हे पुस्तक आवडल्याचं पुस्तकाच्या मागे छापलं आहे. हे वाचून कवी अशोल नायगावकर यांना आमच्या शेजाऱ्यांच्या ओळखीने संपर्क साधला, त्यांनी सुद्दा ते पुस्तक आठवल्याचं सांगितलं.
पुढेमागे त्यांच्या समग्र साहित्यावर काहीतरी करायचा विचार आहे. इतक्या मोठ्या त्यांच्या कलाकृतींना न्याय दिला नाही तर काळ माफ करणार नाही. #rameshsamarth

Comments