रेषाटन आठवणींचा प्रवास- शि.द.फडणीस

रेषाटन आठवणींचा प्रवास- शि.द.फडणीस ह्या पुस्तकातला उतारा. प्रत्येक लेखक, कलाकाराच्या मनातलं बोलणारा.
डोंबिवलीपासून गिरगावपर्यंत झालेल्या तीन प्रदर्शनांत दीड महिना कसा गेले हे कळलंही नाही. हजारो रसिकांची गर्दी, प्रेक्षकांच्या रांगा. हसरी गॅलरीच्या हॉलमध्ये फक्त हशा आणि टाळ्या. या बहुरंगी स्वप्नात तरंगत होता एक `चित्रकार' फडणीस. या फडणीसातल्या एका फडणीसला जाग आली तेव्हा त्याने या उपक्रमाचा हिशेब मांडला तो जमिनीवर उतरल्यावर. जमेकडे काय? तिकीट विक्रीचे अडीच हजार रुपये. भरपूर हशा आणि टाळ्यांचा आनंद. नामवंतांच्या भेटी, खर्च? तीन हजार रुपये. दोन महिने व्यवसायाला राजा देऊन हि सर्कस गावोगावी नेली तो वेळ. ते कष्ट.
एकूण काय हसरी गॅलरी हा सांस्कृतिक कार्यक्रम आतबट्ट्याचा झाला. नंतर शांतपणे विचार केला. या उपक्रमातील त्रुटी प्रथम दूर करायला हव्यात. प्रदर्शन मांडणीचं सामान स्मार्ट पण हलकं, फोल्डिंग असं करायचं व प्रदर्शनावरील करमणूक कर माफ करण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करायचे.
यानंतर १९७०मध्ये ख्यातनाम साहित्यिक प्रा.राम शेवाळकरांच पत्र आलं. आशय असा की वणीच्या विदर्भ साहित्य संघाच्या अधिवेशनात हसरी गॅलरी प्रदर्शन आयोजित करता येईल का? उत्तर काय लिहणार, तूर्त नाइलाज एवढं कळवलं.

Comments