अनस्टॉपेबल : मारिया शरापोवा (पुस्तकपरीक्षण)
प्रसिद्ध टेनिसपटू मारिया शारापोवाने अलीकडे निवृत्ती जाहीर केली आणि ऑडिबलवर मी तिचं आत्मचरित्र विश लिस्ट मध्ये टाकल्याची आठवण झाली. मला खेळ खेळायला आवडतात पण त्या विषयी ऐकायला आणि वाचायला कंटाळा येतो म्हणून इतके दिवस काही खेळांच्या बाबत काही ऐकलं नव्हतं. पण शारापोवाचं आत्मचरित्र ऐकून बघू म्हंटलं. मनापासून आवडलं आणि मजा आली.
रशियातील कुप्रसिद्ध चरनोबिल ह्या गावाच्या जवळ तिचा जन्म झाला. घरचे सामान्य उंचीचे असता ती ताडमड उंच झाली. चरनोबिलचा ह्यावर परिणाम असावा असं मारियाला वाटतं. वडिलांच्या मित्राकडून मिळालेल्या रॅकेटला घेऊन, घराजवळच्या कोर्टवर तिची प्रॅक्टिस सुरू झाली. दुसरी दिग्गज टेनिसपटू मार्टिना नवरातिलोवाच्या एका कॅम्पला गेली असताना तिने, मारियाचा नैसर्गिक खेळ बघून अमेरिकेत जायचा सल्ला दिला. ह्या प्रसंगाला शीतयुद्धाची पार्श्वभूमी आहे. एकीकडे व्यक्तीगत विकासाला प्रोत्साहन देणारा देश आणि दुसरीकडे सगळी माणसे समान करण्याचा आदर्शवाद असलेला देश. पण अमेरिकेत एकटे वर्ष राहून देखील, अजूनही मुलाखतीत विचारलं तर मारिया ती रशियन असल्याचं आवर्जून सांगते.
अमेरिकेत सुद्धा मारियाचा प्रवास सुखकर नव्हता. मारिया तिकडे भांडवलशाही अमेरिकेत गेली ते फक्त आपल्या बाबांबरोबर आणि थोड्याफार डॉलर्सच्या बरोबर. तिकडे जाऊन त्यांची एक पंचाईत व्हायची. बहुतेक कोर्ट खाजगी आणि सोव्हिएत रशियात राहिलेल्या शारापोवा कुटुंबियांना खाजगी हि कल्पना अगदी नवीन होती. रिकाम्या कोर्टवर खेळायला जावं तर ते कोणत्यातरी खासगी संस्थेचं निघायचं. मारियाचे वडिल अनेक छोटीमोठी काम करत राहिले आणि उत्तम कोचिंग साठी पैसे जमवत राहिले. मुलं स्पोर्ट्स स्टार्स होण्यामागे, त्यांना भक्कम पाठिंबा लागतो हे अनेकांच्या चरित्रामधून आपल्याला समजतं. सचिन तेंडुलकरच्या मागे त्याचा भाऊ अजित होता, तसं आपल्या मागे कोणी नव्हतं हे खंत बोलणारा विनोद कांबळी आठवून जातो. मजामस्ती बाजूला ठेवून, प्रचंड प्रॅक्टिस करायला भाग पडणारे आंद्रे आगसीचे वडील समोर येतात. मारियाचे वडील हे तिला टेनिसचं उत्तम प्रशिक्षण मिळावं म्हणून खूप कष्ट करत, काही ठिकाणी तर त्यांनी टेनिस कोर्टवर नोकरी सुद्धा केली आणि मानहानीकारक अटी मन्या केल्या. तिचे वडील टेनिस विषयी माहिती, मासिकं ह्यातून कात्रण काढून मारियाला टिप्स देत द्यायचे. प्रतिस्पर्धी कसा खेळतोय त्या विषयी वाचून त्याची टिपणं काढून ठेवायचे आणि तिला टेनिस जगताशी जोडलेले ठेवायचे. तिच्या यशाचा विचार करताना, त्यात तिच्या वडिलांचे कष्ट किती आहेत से सुद्धा समजत.
ह्या पुस्तकात मारियाच्या विचार करण्याच्या पद्धतीसुद्धा तिने सविस्तर लिहलं आहे. एकदा मारिया लहान असताना तिच्या सेंटरवर विलीयम्स बहिणी सराव करायला आल्या होत्या. एव्हाना विलीयम्स बहिणींचं नाव झालं होतं पण मारिया ज्युनिअर लेवलला खेळत होती. त्या दोघींची प्रॅक्टिस बघायला खूप गर्दी व्हायची पण मारिया ते बघायला कधी गेली नाही. ती तिची प्रॅक्टिस करत बसली. कितीही मोठा प्रतिस्पर्धी असला तरी त्याचा बाऊ करू नये ह्या मताची ती आहे. म्हणून ती बऱ्याच वेळा म्हणते कि तिने टेनिस शिकण्याच्या वयात कोणाला मित्रमैत्रीण न बघता फक्त प्रतिस्पर्धी म्हणून बघितलं. जिंकण्यासाठी जे killing instinct लागतं, त्याचा प्रत्यय मारियाच्या आत्मकथनात जागोजागी दिसतो.
मॉलडोनिअम हे ड्रग तिच्या चाचण्यांमध्ये सापडल्यावर तिच्या झालेली मानहानीवर तिने सविस्तर लिहलं आहे. ती म्हणते, 'ह्या ड्रगचा अंश असलेले औषध रशियात कॉमन होतं आणि तिची आई तिला ते डोकं दुखणं, अंग दुखणं ह्यावर द्यायची. नवीन नियम बदलले आणि त्यात मॉडोनिअमला रेड झोन मध्ये टाकलं आणि ते मारियाच्या नजरेस आलं नाही असं ती म्हणते. ह्या पडत्या काळात तिचा सपोर्टिंग ब्रँड - नायकी तिच्या पासून लांब गेला, जाहिरातदार सोडून गेले, तरी त्यावर मात करून ती कायदेशीर मार्गाने परत मैदानात आली.
अगदी लहान वयात मिळणारं प्रचंड यश, देश सोडून फक्त वडिलांबरोबर केलेला प्रवास, वेगवेगळ्या कोचिंग सेंटरमध्ये शिष्यवृत्तीसाठी केलेले अर्ज, भाड्याने राहताना आलेले वाईट अनुभव, अर्धवट सोडायला लागणार शिक्षण ह्यामधून तिने केलेला प्रवास स्तुत्य आणि अत्यंत प्रेरणादायी आहे. प्रसिद्धीचा प्रखर झोत, भरपूर पैसे ह्यांच्या मागे अनेक वर्ष एका प्रकारच्या एकांतवासात केलेली प्रॅक्टिस असते ह्याची, हे पुस्तक वाचल्यावर परत जाणीव झाली. चाहत्यांनी केलेला नावाचा जयगोष ऐकायला येण्याअगोदर कितीतरी तपं आपल्याच आतला आवाज ऐकत राहावा लागतो, ह्याचं मूर्तिमंत उदाहरण अक्षरशः डोळ्यासमोर उभं राहिलं.
- निनाद खारकर
Comments
Post a Comment