जेव्हा एक पंचतारांकित हॉटेल तुमचा तुरुंग होतो...
२००९ साली व्यवसायाने इन्व्हेस्टमेंट बँकर असलेला अमोर टॉल्स हा लेखक जिनिव्हाच्या एक हॉटेलला कामानिमित्त गेला. तेव्हा त्याला काही लोकं दिसली, प्रथम दर्शनीती लोकं वेगळी वाटली नाही, नंतर त्याच्या लक्षात आलं कि आपण मागे आलो होतो तेव्हा सुद्धा हि लोकं हॉटेलला होती. ह्यावरून त्याला एका कादंबरीची कल्पना सुचली. एक माणूस कायमचा हॉटेल मध्येच राहात असेल तर? ह्या कुतूहलातून जन्म झाला `ए जेंटलमन इन मॉस्को' ह्या कादंबरीचा.
अमोर टॉल्स ह्या लेखकाचं `ए जेंटलमन इन मॉस्को' हे पुस्तक म्हणजे रशियन राज्यक्रांती नंतर विलय पावत गेलेल्या क्रांतीचा उतरता आलेख आहे. रशियन राज्यक्रांती नंतर काही वर्षांनी पुस्तकाची सुरवात होते. काउन्ट अलेक्साण्डर इलियाच रोस्टोव्ह नावाच्या उमरावाला क्रांती विरोधी कविता लिहण्याचा आरोपाखाली अटक होते. शिक्षा देण्यासाठी त्याला अनुशासन समितीच्या समोर सादर करतात. रोस्टोव्हचे मोठया हुद्दयावर असलेले मित्र हे त्याला मृत्यदंड देण्याच्या प्रक्रियेत बाधा आणतील म्हणून त्याला एक वेगळी शिक्षा सुनावण्यात येते, मेट्रोपॉल नावाच्या हॉटेल मध्ये बंदी बनून राहण्याची. बाहेर पडला तर गोळ्या घालू असं वरून निक्षून सांगण्यात येतं. इथून आपला एक वाचक म्हणून रोस्टोव्ह बरोबरचा प्रवास सुरु होतो.
एक हॉटेलचा प्रतिष्ठित ग्राहक ते महत्वाचा कैदी असा महत्वाचा बदल रोस्टोव्हच्या ओळखीत होतो. सर्वात आधी रोस्टोव्हची रवानगी त्याच्या महागड्या सूट मधून एका सामान्य खोलीत होते. हॉटेलच्या सलूनमध्ये वेळ घालावं, दोन रेस्टॉरंट्स मध्ये दिवस मोजत बस, बार मध्ये मद्याचे घुटके घेत इकडच्या तिकडच्या गप्पा मार असे अतिशय कंटाळवाणे दिवस जात असतात. तेव्हा त्याच्या आयुष्यात येते नीना नावाची लहान मुलगी. ह्या मुलीचे वडिल मॉस्को मध्ये कामा निमित्त आले असतात तिच्या बरोबर रोस्टोव्ह जसजसा दिवस घालवायला लागतो तसा तसा त्याच्या स्वतःत बदल होतात. त्याच्या आयुष्यात नवीन नवीन लोक येत राहतात आणि त्यांच्या नजरेतून बदलेला रशिया आपल्याला दिसत राहतो.
स्वतःच्याच देशात कैदी म्हणून राहावं लागणं हे रशियन लोकांच्या वाट्याला आलं होतं आणि त्याच्या बद्दल बाहेर कुठेहि वाच्यता होताना दिसत नाही. सरकारी दडपशाही आणि कॉम्युनिस्ट विचारधारेचा पगडा ह्या दोन गोष्टी ह्या अवस्थेला कारणीभूत होत्या. त्या सर्व गोष्टी प्रतीकात्मक रूपात एक वाचक म्हणून आपल्या नजरे समोर येत राहतात. सरकारने लोकांच्या खाजगी आयुष्यात केलेली ढवळा-ढवळ निरनिराळ्या प्रसंगातून आपण बघत राहतो. ह्या पुस्तकात चित्तथरारक प्रसंग, अंगावर काटा उभा राहील अशी वर्णन नाहीत पण संथ चालत राहणार कथेचा प्रवाह आहे. एक माणूस, एका हॉटेलात ३० पेक्षा जास्त वर्ष राहिल्यावर त्याच्यात काय काय बदल होतील आणि तो जगाकडे कसा बघेल ह्याचं उत्तम चित्रण आहे. उदारणार्थ सांगायचं म्हणजे राज्यक्रांती नंतर त्याचे उमराव असलेले नातेवाईक आणि मित्र दूर गेले आहेत. हॉटेलमध्ये एकटा पडल्यावर त्याला आठवण येते त्याच्या बहिणी आणि आजी बरोबर घालवलेल्या दिवसांची. सुरवातीचा कठीण काळ गेल्यावर तो हॉटेल मध्यलया लोकांशी नातं जोडतो. छोटी मुलगी नीना पुढे तिची मुलगी सोफीया ह्या दोघींबरोबर वडिलकीचं नातं, अभिनेत्री आणि हॉटेल मध्ये बरेचदा येणाऱ्या ऍनाशी प्रेमाचं नातं जोडतो. आधी उमराव आणि राजकीय कैदी म्हणून ह्या थाटात जगणारा नायक नंतर वेळ जावा आणि काम मिळावं म्हणून हेड वेटरची नोकरी मिळवतो आणि संवाद कौशल्याने लोकांना चकित करतो. वेगवेगळ्या नात्यांमध्ये आणि कामामध्ये रोस्टोव्ह इतका रमतो कि कधीकाळी हॉटेल मधून साचेबद्धतेल कंटाळून आपण आत्महत्या करणार होतो हे देखील विसरतो. जगात होत जाणाऱ्या घटना आपल्या कथेचा नायक एका प्रशस्त हॉटेलात बसून बघत राहतो, नकळत बदलत जातो. कथा शेवटाकडे जाताना अनपेक्षित वळण घेते.
हि कथा ह्या हॉटेलमध्ये घडते ते मेट्रोपोल हॉटेल प्रत्यक्षात मॉस्कोत आहे. १९०५ला स्थापना झालेलं हे हॉटेल अनेक ऐतिहासिक गोष्टींचं साक्षीदार आहे, उदाहरणार्थ गरम पाण्याची सोय, टेलिफोन, आंतराष्ट्रीय खाद्यपदार्थ, अमेरिकन पध्धतीची लॉबीबी वगैरे सुखसोयी असणारं हे हॉटेल रशियातील प्रथम. गमतीचा भाग म्हणजे `टेन डेज दयाट शुक द वर्ल्ड ' हे रशियन राज्यक्रांतीवरच जगप्रसिद्ध पुस्तक लिहणारा लेखक मेट्रोपॉल हॉटेलला येऊन गेला होता. बोल्शेव्हिक गटाने जेव्हा मॉस्को काबीज केली तेव्हा त्यांच्याकडे कारभार करायला पुरेसे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं म्हणून मेट्रोपॉल हॉटेलला आपला बालेकिल्ला बनवलं, तिथल्या पाहुण्यांना बाहेर काढून, आणि हॉटेलला नाव दिलं `द सेकंड हाऊस ऑफ द सोव्हिएटस'. सोविएत रशियाच्या संविधानचा महत्वाचा भाग ह्याच हॉटेलच्या सूट नंबर २१७ मध्ये लिहला गेलाय आणि तो सुद्धा लिहणाऱ्या लोकांना खोलीत बंद करून लिहून घेतला गेलाय. नंतर हॉटेलचं काय करायचं हा प्रश्न असतानाच परदेशी शिष्टमंडळाना भुलवण्यासाठी ह्याचा वापर केला जाऊ शकतो हे कल्पना अधिकाऱ्यांना सुचते आणि हॉटेल पुन्हा जिवंत होतं
इतकाही ऐतिसाहिक प्राश्वभूमी असताना त्यात एक ललित कथानक बसवणं हे कमी अवहनात्मक होतं असं वाटतं. कारण इतिहासाचा एवढा मोठा तयार कॅनवास असल्यावर त्यात रंग भरत जाणं हे तुलनेने सोपं काम आहे, त्यात लेखक बऱ्यापैकी यशश्वी झालाय. ह्या पुस्तकाची बऱ्याच भाषांमध्ये भाषांतरं होऊन त्यावर नेटफ्लिक्स मालिका सुद्धा लवकरच येणार आहे. एका ललित कथेतून, विस्मरणात गेलेलं सोविएत जग अनुभवायची संधी ह्या कादंबरीतून मिळते आणि त्या काळात आपण सफर करून येतो. आपण फिरून आलो तरी मेट्रोपोल हॉटेल अजून तिथेच असेल, होऊन गेलेल्या इतिहासाची साक्ष देत आणि नवीन गोष्टी जन्माला घालत.
निनाद खारकर
Contact – kharkarninad1@gmail.com
Twitter- @ninadkharkar
Published in Baranee
Comments
Post a Comment