रशियन बालपण आणि नोस्टॉजिया
{पुस्तक आस्वाद}
पुस्तक- Everything is normal the life and times of a soviet kid Sergey Grechishkin
90च्या दशकापर्यंत लायसन्स परमिट कोटा राज असणाऱ्या भारतात ज्यांचा जन्म झालाय ते 90s नॉस्टॅल्जिक असतात. एक व्यवस्था जी, आपल्या जगण्याचा अविभाज्य भाग होती, ती काळानिरुप हळू हळू बदलत गेली आणि शेवटी आपल्याला सुद्धा बदलवून गेली. सर्गीचं हे पुस्तक वाचताना ह्याचं भारताच्या सामूहिक स्मृतींची आठवण येते.
ह्या आठवणी आहेत सोविएत रशियात आजी बरोबर राहणाऱ्या सर्गीच्या. त्याच्या आई वडिलांचा घटस्फोट झालाय म्हणून तो त्याच्या आजी बरोबर सोविएत रशियाच्या एका छोट्या उपनगरात राहतोय. अन्नधान्याची टंचाई असताना सोविएत बायका कश्या स्वयंपाक करायच्या ह्याचं तो मजेदार उदाहरण देतो. हव्या त्या भाज्या आणायच्या असल्या की भाजीवाल्यांना मस्का लावायला लागायचा. विक्रेत्यांशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारायच्या. ते काम त्याची आजी आणि आई इतर सोव्हिएत गृहिणींसारखं उत्तम करायच्या. बाजार केंद्रित उत्पादन-पुरवठा नसल्याने लोकांना काय हवंय हे लक्षात न घेता वस्तू विक्रीला असत. म्हणून कोणतीही वस्तू घेताना दहावेळा विचार करावा लागत असे. कारण वस्तू विकत घेताना लावाव्या लागणाऱ्या रांगा. सर्गी एकेठिकाणी म्हणतो की सोविएत नागरिकांचं आयुष्य रांगेतच गेलंय.
सोविएत रशियात 80च्या दशकात ऑलम्पिक होतं. त्यावेळी पेप्सीला ठराविक काळासाठी परवानगी दिली होती. त्यावेळी पेप्सी हि पोराटोरांसाठी पर्वणी होती. तिथली पोरं पैसे साठवून, जुन्या वस्तू विकून पेप्सी प्यायची. रशियाने पाहुण्या देशांसाठी भरपूर तयारी केली होती पण ऐन वेळी अमेरिकेच्या समर्थक राष्ट्रांनी माघार घेतली. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ऑलम्पिक ज्या शहरात होणार होते तिकडून सगळ्या लहान मुलांना बाहेर पाठवायचे आदेश आले. लोकशाही देशात राहणाऱ्या लोकांना हे अतर्क्य वाटू शकेल पण सोव्हिएत मध्ये हे तेव्हा घडत होतं. सर्गीला त्याला काळात आपल्या मित्राच्या गावी राहायला जावं लागलं.
बाकीच्या जगात जेव्हा पैसा हेच एक चलन होतं तेव्हा सोव्हिएत रशियात सत्ताकेंद्रात ओळख हे हुकमी नाणं होतं. सर्गी शाळेत असताना त्याची 'परदेशी शिष्टमंडळाचं स्वागत करणे' ह्या समितीचा प्रमुख म्हणून नेमणूक झालेली. कारण का तर, नेमणूक करणाऱ्या शिक्षिका सर्गीच्या आजीच्या विद्यार्थिनी होत्या म्हणून ही नेमणूक.
सर्गीच्या लहानपणी त्याचे एका छतावरून दुसऱ्या छतावर उडी मारून जाण्याचे किस्से आणि त्यात मित्रांसोबत केलेल्या करामती वाचताना भारतात दिसणारी लागून असलेली घर आणि त्यावर टाकलेली वाळवणं ह्यांची आठवण आली. परदेशातून कोणीही आलं की त्यांना आणायला सांगायच्या वस्तू हि गोष्ट सोविएत रशियात खूप सामान्य होती. भारतात सुद्धा 'कस्टमच्या' गोष्टींना आलेलं महत्व हेच सांगतं.
स्टेट प्रॉपगंडाची आठवण सांगताना सर्गी सांगतो की सरकारची टिका ऐकायला मिळायची नाही. परदेशी रेडिओ स्टेशन्स सरकारची टिका, धार्मिक चर्चासत्र वगैरे प्रक्षेपित करायची ती ऐकण्यासाठी बराच जुगाड, बरीच सेटिंग लावायला लागायची. आधी ती ऐकणं म्हणजे पाप करतोय असं वाटायचं पण कुतूहल म्हणून ऐकायला मजा यायची असं सर्गी सांगतो.
एका प्रकरणात सोविएत रशियातल्या माणसांच्या आयुष्याविषयी म्हणतात सर्गी म्हणतो, रोज सकाळी सार्वजनिक वाहने लोकांना कामावर पोहोचवायची आणि तीच वाहन त्यांना परत आणायची. लोकांचं आयुष्य असचं मागे पुढे हेलकावे खात सुरू असायचं.
ह्यातली एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे कणखर रशियन बायकांचं केलेलं चित्रण. पुरुष कामाला गेलेले, रेशनची टंचाई, विषम वातावरण, मोठी कुटुंब ह्यात रशियन बायकांची कुटुंबाला बांधून ठेवायची कसरत व्हायची. द अमेरिकन्स ह्या माझ्या आवडत्या सिरीज मध्ये सुद्धा रशियन बायकांबद्दलची ही बाब अधोरेखित केली होती.
वयाच्या एका टप्प्यावर सर्गी सोविएत सोडून लंडनला स्थायिक होतो. एका स्टुडन्ट एक्सचेंज प्रोग्रॅममध्ये भेटलेल्या एका झकास रशियन मुलीशी लग्न करतो. एकेकाळी तोडकं मोडकं इंग्रजी बोलणाऱ्या सर्गीची तीन लहान मुलं आता फक्त इंग्रजी बोलतात. त्याच्या रशियन आजीला त्याला लंडन फिरायला सर्गी आणताना भावुक होतो. १९४१ला जर्मन फौजांनी रशियावर हल्ला केला असताना त्याची आजी सुरक्षित ठिकाणी जाताना छोट्या चणीच्या विमानात बसली होती. आज सुद्धा जाताना सर्गीची आजी अश्याच उबदार ठिकाणी जात होती, सर्गीच्या घरी. सर्गी अश्यावेळी म्हणतो, 'But as history teaches us, the only predictable thing about life is its unpredictability.'
सध्या सर्गी सिंगापूरला आपल्या कुटुंबा बरोबर राहतो अशी माहिती मिळाली. त्याला पुस्तक आवडल्याचे काळवायचा विचार आहेच. शेवटी पुस्तकाकडे वळून बघताना असे जाणवतं की हे भारताचं ७० आणि ८० च्या दशकांचे चित्रण आहे. पंचवार्षिक योजना, शासकीय समाजवाद, मर्यादित लोकांसाठी मर्यादित नोकऱ्या. हे चित्र बदललं उदारीकरणा नंतर. आधी भारतात संधी नसलेला एक मोठा वर्ग मग भारत सोडून गेला. उदारीकरणात सुद्धा भारत 100% यशस्वी झालाय असं म्हणता येणार नाही. कारण त्याने नवीन प्रश्न निर्माण केले. ह्यातील रशियाचे संदर्भ बदलून भारतीय संदर्भ टाकले तरी हि गोष्ट भारतात सहज खपेल. कारण गतस्मृतींसारखी नशा कोणतीच नाही.
- निनाद खारकर
#ninadkharkar #nkcalendar #soviet #nostalgia #bookreview #marathibookreview
Comments
Post a Comment