कोबाल्ट ब्लू येतंय नेटफलिक्सवर

सचिन कुंडलकर ह्यांच्या कोबाल्ट ब्लू ह्या कादंबरीवर नेटफलिक्स चित्रपट करत असल्याची बातमी वाचली. त्यांच्या कादंबरीचा चाहता म्हणून बरं वाटलं.
कोबाल्ट ब्लू कादंबरी वाचून झाली तेव्हा बऱ्याच दिवसांनी मराठीत रिफ्रेशिंग वाचायला मिळालं होतं. हे पुस्तक मिळवायला बरीच धडपड करावी लागली, आधी डोंबिवलीच्या ग्रंथालयात विचारलं तर, `आम्हाला फक्त सचिन तेंडुलकर माहिती आहे, सचिन कुंडलकर माहिती नाही असं उत्तर मिळालं.' नंतर डोंबिवलीच्या मॅजिस्टीककडे विचारलं तर त्यांच्याकडे हल्ली पुस्तकांचा खप कसा कमी झालाय ते ऐकायला मिळालं. ते मुंबईवरून मागवून देतो म्हणालेपण बरेच दिवस त्यांचा काही फोन आला नाही म्हणून ठाण्यात एक-दोन ठिकाणी विचारलं तर तिकडे सुद्धा नव्हतं, शेवटी एक फेसबुक वरच्या एका परिचितांकडून पुस्तक मिळवलं. हि अशी खटपट करण्याचं कारण म्हणजे ह्या पुस्तका बद्दल आणि सचिन कुंडलकर ह्यांच्या बद्दल ऐकलं होतं. निळू दामले ह्यांनी सचिन कुंडलकर ह्यांची वाचन ह्या एकाच मुद्द्यावरून घेतलेली youtube वर असलेली मुलाखत बघितलेली होती. त्यात त्यांचे विचार आवडले होते, जेरी पिंटो ह्यांनी कुंडलकर ह्यांचे पुस्तक इंग्रजीत भाषांतरित करताना केलेल्या अभिवाचनाचा व्हिडीओ बघितला होता आणि गार्डियन ह्या वृत्तपत्रात आलेल्या त्या पुस्तकाचा अंश वाचला आणि हे पुस्तक वाचायचं हे नक्की केलं.
परंपरांचा अभिमान हा शालेय पाठ्यपुस्तकांतून पुरेपूर शिकवला जातो. त्या परंपरांचे पाईक वगैरे होणं कर्तव्यनिष्ठ कसं आहे हे सांगितलं जातं. रूढार्थाने नायक असणारे ह्याच वाटेने जाताना दिसतात. वेगळ्या वाट धुंडाळल्या तरी ते त्यांची परंपरागत चौकात सोडून बाहेर जात नाहीत. व्यक्तिवादि किंवा उपभोगतावादी असणं हे सकारात्मक पध्धतीने मांडणारं हे पुस्तक आहे. तनय, अनुजा हे भावंडं त्यांच्या घरात राहायला येणाऱ्या उमद्या भाडेकरुच्या प्रेमात पडतात आणि त्यांच्या भावनाविश्वात जी आंदोलन होतात ते रंगवणारा पट म्हणजे हि कादंबरी.
तनय, अनुजा हे त्यांच्या एका सामान्य भावाबरोबर आणि टिपिकल मध्यमवर्गीय आई बाबां बरोबर राहताना  त्यांच्यात होणारा बदल हळूवारपणे रंगवला आहे. माझा मूळ मुद्दा म्हणजे सचिन कुंडलकर हे मला कादंबरीकार म्हणून जेवढे आवडले तेवढे ते दिग्दर्शक म्हणून माझ्यावर छाप पाडू शकले नाही. समृद्ध वाचन हा त्यांचा छंद आहे आणि तो त्यांच्या लिखाणात सहज डोकावतो पण चित्रपट ह्या व्यावसायिक माध्यमात त्यात बरेच अडथळे येत असावे.
कोबाल्ट ब्लु ह्या कादंबरी सारखी पार्श्वभूमी असलेला 'Call Me by Your Name' हा नितांत सुंदर चित्रपट बघण्यात आला. समलैंगिकता भडकपणा टाळून coming of the age चित्रपट कसा असावा ह्याचं उत्तम उदाहरण वाटलं. ज्यांना कादंबरी वाचणं शक्य नसेल त्यांनी हा चित्रपट जरूर बघावा. माणूस आपल्या लैंगिकते विषयी कसा व्यक्त होऊ शकतो हे फारच उत्तम दाखवलं आहे. सर्वोच्च न्यायालय सर्व प्रकारच्या विविधतेला अंगिकरात असताना, बाजार केंद्रित नव-माध्यमाने समांतर विषय मध्यवर्ती आणावे हे सकारात्मक आहे.
- निनाद खारकर

Comments

Post a Comment