The American

नुकताचं `द अमेरिकन' ह्या मालिकेच्या सहाव्या आणि शेवटच्या सिझनचा शेवट झाला. शीत युध्दाच्या काळात, रोनाल्ड रेगन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतानाच्या ८०च्या दशकात सोविएत संघाचे गुप्तहेर अमेरिकन नागरिक बनून अमेरिकेत राहतात आणि गोपनीय माहिती मिळवतात अशी ह्या मालिकेची सर्वसाधारण गोष्ट आहे. मालिका आवडण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकी चित्रपटांत रशियन लोकांचे जे राक्षसीकरण केले जाते ते सर्वथा टाळले आहे. मालिकेचे सर्व कथन हे राजकीय मुत्सद्दीगिरी, हेरगिरी, आंतरराष्ट्रीय संबंध, शीत-युद्ध, भांडवलशाही आणि कॉम्युनिझम ह्या मुद्द्यां भोवती फिरत असले तरी मानवी संबंधांचं घट्ट आवरण आहे. हि मालिका बनवणारा जोसेफ वेशबर्ग हा अमेरिकेच्या CIA ह्या गुप्तहेर संस्थेत अधिकारी होता म्हणून एक दंत कथा अशी सुद्धा आहे कि CIA ला  `द अमेरिकन' मालिकेचे भाग सर्व प्रथम आधी दाखवले जातात, त्यांची परवानगी असेल तर पुढे प्रक्रिया केली जाते.

मुळात मालिका, त्या मालिकेतली पात्र, कथानक, सांख्यिकी तथ्य ह्या बाबी समांतर ऐतेहासिक वाग्मयात दुय्यम असतात. महत्वाचे असतात ते जो काळ उभा केला आहे त्या काळाने निर्माण केलेले प्रश्न आणि त्यात शोधली गेलेली उत्तर. उपभोक्तावादी भांडवलवादाचे स्वप्न दाखवणारे अमेरिकन ड्रिम आज सुद्धा अनेक भारतीय लोकांना भुरळ पाडतं. मागे एका प्रसिद्द डाव्या विचारवंतांच्या  लेखात सावरकरांचे अनिवासी भारतीय अनुयायी  परदेशात स्थायिक होऊन, `ने मजसी ने', सारखी गीते ऐकतात यावर टिपण्णी होती. दुसऱ्या एका मान्यवर डाव्या लेखकाच्या एका पुस्तकात ते अमेरिकेत गेले असता तिकडे आढळणारी मातृभूमी सोडण्याची तीव्र आणि तत्पर इच्छा असलेलं लोक ह्यावर त्यांच्या समाजवादी दृष्टिकोनांतून टिप्पणी केली आहे. भारतात समाजवादी आर्थिक परंपरेने ना पुरेश्या नोकऱ्या झाल्या, ना शेतीचं भलं झालं. अश्या अवस्थेत एक मोठा पांढरपेशा वर्ग संधी मिळताच उपयुक्ततावादी बनून स्थलांतरित झाला. रशियातल्या ह्याच वर्गाचं प्रतिनिधित्व `द अमेरिकन' मधला नायक फिलिप जेनिंग्स करतो. त्याला मदर रशिया बद्दल प्रेम आहे आणि कर्तव्याची जाणीव आहे पण त्यात रशियात गरिबीत गेलेलं बालपण, रेशनच्या दुकाना समोर लावलेल्या रांगा, उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावतो. त्याच वेळी अमेरिका ह्या शत्रू राष्ट्रात सामान्य नागरिक म्हणून राहताना अमेरिकेची आर्थिक सुबत्ता, राहणीमान, सहज मिळणाऱ्या दैनंदिन गोष्टी ह्या त्याला हव्याहव्याश्या  वाटतायत. त्यातून तो अमेरिकेत स्थायिक होऊया का? ह्या विचाराप्रत आला आहे. त्याची बायको एलिझाबेथ जेनिंग्स सुद्धा एक गुप्तहेर आहे. रशियाच्या KGBने त्यांचं लग्न लावून देऊन हेरगिरीच्या कामगिरीवर पाठवलं आहे.  एलिझाबेथ हि कर्तव्यकठोर आहे, रशियन क्रांतीच्या तत्वांनी भारावलेली आहे. ह्या जोडप्याला अमेरिकेत जी मुलं झाली आहेत मुलगी पेज आणि मुलगा हेन्री ह्यांच्यावर होणाऱ्या अमेरिकी संस्कारा बद्दल नाखूष आणि साशंक आहे. ह्यात त्यांच्या मुलीना पेजला तिचे आई वडील कोण आहेत ह्याची ओळख नंतर होते आणि ती सुद्धा त्यांना सहभागी होते. अशी हि कथेची तोंड ओळख होत असताना त्यांच्या शेजारी अमेरिकेची  गुप्तचर संस्था FBIचा अधिकारी स्टॅन बिमन राह्यला येतो आणि कथेत रंग भरायला लागतो.  सोविएत संघ सोडून अमेरिकेत हेर म्हणून स्थायिक झालेले फिलिप आणि एलिझाबेथ आपल्या मुळांपासून फार लांब आले आहेत. सोविएत संघात त्यांना आता कोणी ओळखणारे सुद्धा नाहीत. त्यांची मुलं सुद्धा अमेरिकन संस्कृतीत वाढल्याने त्यांच्या मुलांच्या विचार करण्यात फार मोठी दरी आहे. ह्या सगळ्यात तारेवरची कसरत करून फिलिप आणि एलिझाबेथ हेरगिरी करतात आणि आपलं कुटुंब सांभाळतात.

सोविएत संघाने आपले अनेक हेर सामान्य नागरिक म्हणून अमेरिकेत पाठवले होते. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी त्यांना The Illegals Program ह्या ऑपरेशन अंतर्गत पकडले. सामान्य नागरिक म्हणून पाठवताना मृत अमेरिकन लोकांचे डिटेल्स घेऊन फेक ओळखी बनवल्या गेल्या आणि रशियन हेरांना नवीन अमेरिकन ओळख दिली. ह्या मालिकेचा लेखक The Illegals Program मध्ये अमेरिकन अधिकारी म्हणून सहभागी होता म्हणून त्यात व्यवस्थेचं असं स्वतःच आकलन असतं ते पुरेपूर आलं आहे. ह्या मालिकेच्या लेखनाचं विशेष कौतुक करावंसं वाटतं ते ह्या कारणासाठी कि सोविएत हा अमेरिकन लोकांचा शत्रू असला तरी बऱ्याच रशियन व्यक्तिरेखा नायकाच्या भूमिकेत आहेत. दर्शक म्हणून बघताना त्यांच्या विषयी कवण, सहानुभूती वाटते. मालिकेचं लेखन करताना लेखकांना `तुम्ही रशियन लोकांच्या जागी असता तर कोणती भूमिका घेतली असती?` असा विचार करून लिहायला सांगितलं होतं. जेम्स बॉण्ड, रेम्बो वगैरे सिनेमात थंड डोक्याने माणसं मारत सुटणारे हिरो इकडे दिसत नाही किंवा युद्ध झाले कि हिंसा बघून धक्का बसणारे भारतीय हिरो सुद्धा ह्यात नाहित. अपर्याप्त हिंसा आणि त्यातून घडत जाणारी व्यक्तिमत्त हि कथेची जमेची बाजू आहे. नियती हि हिंसे पेक्षा क्रूर आणि अधिक वेदना देणारी असते हे पैलू घडणाऱ्या घटनांच्या बरोबर सहज समोर येत जातो. कथानक पुढे नेण्यासाठी पात्रांना मारून टाकणे वगैरे सोपे उपाय न घेता कथानक एक वेगळ्या सैद्धांतिक पातळीवर जातं तेव्हा कथेमागे घेतलेलं कष्ट दिसतात. कोणतीही व्यवस्था कार्यरत असण्यासाठी एका सुमारतेची आवश्यकता असते ती सुमारता विचार करणाऱ्या लोकांना नेहमीच अस्वस्थ करते. आंतरराष्ट्रीय राजकारणात आपण फक्त एक माध्यम आहोत हि जाणीव झाल्यावर रशियन हेर फिलिप आणि अमेरिकन एजन्ट स्टॅन बिमन ह्या दोघांत होणार बदल लक्षणीय रीतीने दाखवलाय. सहा भागांच्या मालिकांचे शेवट हा सोविएत संघाच्या आणि गार्बाचेव्ह ह्यांच्या पेरेस्त्रोइका आणि ग्लासनस्तने होतो. जगाचं होणारे सांस्कृतिक सपाटीकरण, अमेरिकन तत्वांचा होणार प्रसार, मॅकडोनाल्ड आणि Mtv संस्कृती सगळीकडे पसरतेय. एन्ड ऑफ इडिओलॉजि ह्या संकल्पने प्रमाणे चक्र फिरायला लागली कि काय असा संशय येतोय. ज्या वैचारिक गंतव्याकडे वाटचाल करायची आहे तेच डळमळतंय असं होताना आपल्या  सोविएत नायकचा प्रवास अनिश्चिततेकडे सुरु होतो.

निनाद खारकर 

Comments