Thoughts on Shiv Jayanti (Birth anniversary of Shivaji)
शिवजयंती निम्मित काही विचार
१. महाराष्ट्राने इतिहासाच्या रद्दीतून बाहेर पडायची गरज आहे. कोणाला हवेत महापुरुषांचे पुतळे? त्यांची जात बघून आपल्या चेकलिस्ट मध्ये ऍड करणारे लोक, जयंत्या, पुण्यतिथ्या त्या निम्मित मिळणाऱ्या सुट्ट्या, त्या सुट्ट्यांमध्ये ऐकले जाणारे पुरुषार्थ वगैरे जागवणारे साहित्य, फेटे घालून ढोल बडवत फिरणारी मुलंमुली, मेसेज मधून फिरत फिरत येणारा तुकड्या तुकड्यातला इतिहास... पण तो भाग सोडलाच तर महाराष्ट्रात उरतं काय? उदारीकरणा नंतर बकाल झालेली शहरं, तुंबलेली गटारं आणि वाकून गेलेली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था.
२. काही दिवसापूर्वी शिवाजी विषयी अपशब्द वापरल्यामुळे अखिल महाराष्ट्राला क्रोध अनावर झालेला. ती ऑडिओ क्लिप ऐकून मला वाईट वाटलं ते फक्त एक वरिष्ठ अधिकारी वापरात असलेल्या भाषे बद्दल. उच्च-नीच असण्याच्या संकल्पना जिकडे खोल रुजल्या आहेत तिकडे असे बारीक मुद्दे अस्मितेच्या नावाखाली सहज दाबून जातात. आमचे महापुरुष इतका लवकर तेजोभंग होण्या इतके लवचिक आहेत का?
३. महाराष्ट्रातले लोक शिवाजीवर `बघतोस काय मुजरा कर' चित्रपट काढतात पण गम्मत म्हणजे त्यात चित्रपटातल्या महिला पात्रांना शिवाजी बद्दल काहीच वाटत नाही. महिला पात्रांचं काम फक्त मुलं सांभाळणं, पोवाड्यावर टाळ्या वाजवणं आणि हिरोच्या मिठीत शिरणं.
४. पत्रकारिता शिकवताना एका शिक्षकांनी एक किस्सा सांगितला होता. एका माणसाला मराठी टू इंग्रजी शिवचरित्र कॉमिक्स स्वरूपात लिहण्याचं कामं मिळालं होतं. पण त्याची झाली पंचाईत. नुसतं शिवाजी कसं लिहणार म्हणून त्याने शिवाजी महाराज लिहलं, नंतर त्याला संपादकांचं उत्तर आलं, `अरे बाबा शिवाजी द ग्रेट तरी लिही' पण उगाच व्हर्नाक फ्लेवर आणू नको.
#shivjayantithought
Comments
Post a Comment