ब्रँड ऍक्टिव्हिसमच्या मर्यादा

ब्रँड ऍक्टिव्हिसमच्या मर्यादा
काही वेळा जाहिराती त्यांनी घेतलेल्या सामाजिक भूमिकांमुळॆ लक्षात राहतात. जाहिरातींनी घेतलेल्या भूमिकांना ढोबळमानाने म्हणतात ब्रँड ऍक्टिव्हिसम. वैयक्तिक फायदा लक्षात ठेवून अश्या भूमिका घेतल्या आणि बदलल्या जातात.
थोड्याच दिवसांपूर्वी पेप्सीने आपली एक जाहिरात मागे घेतली. त्या जाहिरातीत ब्लॅक लाईफ मॅटरह्या कृष्णवर्णीय लोकांच्य या मानवी हक्कांबद्दल अमेरिकेत चालत असलेल्या चळवळीचा आधार घेण्यात आला होता. इमारतीच्या टपावर बसून सेलो नावाचं वाद्य वाजवत बसलेला लॅटिनो तरुण आणि चित्र काढत बसलेली मुस्लिम तरुणी ह्यांची दृश्य संगीताच्या साथीने झळकत राहतात. रस्त्यावरून जाणारा मोर्चा बघून शुटिंग करत असलेली मॉडेल सोनेरी केस असलेली मॉडेल आपला विग काढून काळे केस उघडे करते, मोर्चात सामील होते. सरते शेवटी आपल्या हातातला पेप्सीचा कॅन मोर्चावर लक्ष ठेवणाऱ्या पोलिसाला देते आणि जाहिरात संपते. कृष्णवर्णीय लोकांवर अमेरिकेतल्या मुख्यत्वते गोऱ्या पोलिसांकडून होणारे अत्याचार लक्षात घेता हा विषय संवेदनशील ठरला, अधोरेखित करायचं झालं तर २०१५ला बाल्टिमोर येथे झालेलं कृष्णवर्णीय तरुणाच्या मृत्यूनंतर झालेलं आंदोलन खुप गाजलं होतं, पोलिसी बळावर भरपूर टीका झाली होती.
दुसरी  चर्चिली गेलेली जाहिराती म्हणजे हनिकेनह्या बिअर कंपनीची 'वर्लड्स अपार्ट' ह्या नावाने बनवलेली गेलेली जाहिरात. हयात टोकाचे राजकीय विचार असलेल्या व्यक्तींच्या विविध विषयांवरच्या प्रतिक्रिया आधी रेकॉर्ड केल्या गेल्या. नंतर विरुद्धमत असलेल्या व्यक्तींना थोडा वेळ भेटवून त्यांना त्यांची विधानं  दाखवण्यात आली. ह्या नंतर त्यांना एकत्र बिअरचे घोट चर्चा करणाऱ्याचा  किंवा मत वेगळी आहेत  म्हणून निघून जाण्याचा पर्याय देण्यात आला. बऱ्याच  समोरासमोर बसून  निवडला असं  जाहिरात सांगते. ह्यात हनिकेनने कोणतीही भूमिका घेण्याचे प्रकर्षाने  टाळले आहे. अराजकीय आणि ननैतिक राहून आम्हाला लोकांना एकत्र आणायचे आहे, असं जाहिरात सांगते.
दोन्ही जाहिरातींचा एकत्र विचार केल्यास ह्यात पेप्सीची जाहिरात माफी मागून मागे घेतली गेली आहे तर हनिकेनच्या जाहिरातीला तश्या बऱ्या प्रतिक्रिया आल्या आहेत. पोलीस बळाचा वापर आणि मानवाधिकारां बाबतीत अमेरिकेत असलेली सजगता पेप्सीला जाहिरात मागे घ्यायला लावते. इथे दुसऱ्या बाजूला असलेल्या लोकांच्या विचार स्वातंत्र्याचे काय हा प्रश्न उभा राहतो. पेप्सीच्या जाहिरातीवर टीका व्हायला लागल्यावर पेप्सीच्या प्रतिस्पर्धी कंपन्या, इतर सेलिब्रिटी ह्यांचे सुद्धा ट्विट्स जाहिराती विरुद्ध आले, अर्थात ह्यात फक्त कल्याणकारी हेतू असेल का ह्या बाबत शंका वाटते. शिवाय  सामाजिक चळवळींवर नेहमी गंभीर भाष्याचं करायचे का? हा प्रश्न उभा राहतो. सर्वात सेफ गेम हनिकेन जाहिरातींनी खेळला आहे, ह्या तुमच्या समस्या, हि त्या समस्या मांडणारी माणसे तुम्ही एकमेकांशी वादविवाद कराल तेव्हा आम्ही तुमचे दर्शक म्हणून असू असा जणू संदेश दिला आहे.
ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतात असं काही होत नाही का असा प्रश्न पडेल. मागे जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आंदोलन गाजत असताना यात यात्रा डॉट कॉम ह्या कंपनीने तिकीट बुक करण्याची आझादी मागणारा तरुण दाखवला होता. नोटबंदी झाल्यावर पेटीएम सारख्या कंपन्यांनी जाहिराती द्वारे आपला योजनेला पाठिंबा कसा दाखवला होता हे तर प्रसिद्ध आहे.
वेगवेगळे ब्रॅण्ड्सहे लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. सामाजिक  अवकाशात त्यांनी केलेल्या जाहिरातींना कलाकृती म्हणून स्थान आहे. सरकारने सार्वजनिक जीवनातून अंग काढून घेण्याच्या काळात आणि सामाजिक चळवळी ह्या अधिक अधिक मर्यादीत होत जाण्याच्या काळात लोकांना सामाजिक अवकाशात असणाऱ्या प्रत्येक कलाकृतीकडून कोणत्या तरी सटीक भाष्याची निकड भासते. ब्रॅण्ड्सना हि गरज बरोबर समजली आहे, त्यानुसार ते आपले वर्तन लवचिक ठेवतात. फक्त ब्रॅण्ड्सने सामाजिक अवकाश ठरवणे समाजासाठी योग्य होणार नाही. वेगवेगळे राजकीय प्रवाह, निरनिराळया संस्कृती, सामाजिक चळवळी आणि खाजगी ब्रॅण्ड्सने बनलेला विविधांगी सामाजिक अवकाश अधिक पोषक आहे. प्रत्येकाने त्या साठी सक्रिय प्रयत्न केल्यास कोणत्याही बिअर कंपनीला एकत्र या असं सांगायची वेळ येणार नाही. 
Ninad Kharkar
(k.ninad11@gmail.com)
Twitter- @ninadkharkar

Comments