सेकुलर राष्ट्रवाद
शेषराव मोरेसरांनी आजच्या लोकसत्ताच्या लेखात राष्ट्रवादाची मांडणी करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले आहे. डाव्यांचा राष्ट्रवाद वगैरे गोष्टींवर विश्वास नसतो आणि उजव्यानचा आपलाच राष्ट्रवाद कसा खरा आहे ह्या वर दावा असतो. बेनेडिक्ट अन्देरसन ह्या नुकतेच निधन झालेल्या प्राध्यापकांनी राष्ट्रवादाची मांडणी त्यांच्या Imagined Communities: Reflections on the Origin and Spread of Nationalism ह्या ग्रंथात केली आहे. बेनेडिक्ट अन्देरसन म्हणतात, " मार्क्सवाद आणि उदारमतवाद ह्यांचा विस्तार ज्या प्रमाणे राजकीय तत्ववेत्यांनी केला आहे त्या प्रमाणात राष्ट्रावादाची संकल्पना कोणत्याच जेष्ठ तत्वेत्यांना भावलेली नाही. राष्ट्रवाद हि आधुनिक जाणीव आहे तरी सुद्धा लोकांची भावना आपण अनंत काळा पासून एक राष्ट्र आहोत अशी असते. राष्ट्रवादाची आधुनिक जाणीव तीन पूर्वग्रहांचा त्याग करून होते ते म्हणजे ज्ञानावर एकाच भाषेचा हक्क, एकाच समाजाचा शासन करण्याचा हक्क आणि जगाचा आणि मानवजातीचा आरंभ हा एकाच बिंदू पासून सुरु झाला असल्याचे मान्य करणे." संविधानातल्या सेकुलरतत्वांनी राष्ट्रवादाची मांडणी शासकांनी केल्यास; इतिहासात एकमेकां विरुद्ध असलेले समाज एक राष्ट्र म्हणून एक येवू शकतात असा जगाचा अनुभव आहे.
कालच्या लोकसत्ता मधल्या दुसऱ्या बातमी प्रमाणे दिव्या मधल्या रिक्षावाल्यांनी निजेरिअन रहिवाश्यांना रिक्षा मिळणार नाही अशी पाटी लावली आहे. अनिवासी भारतीय लोकांना परदेशात अशी वागणूक मिळाली असता आपल्याकडे वंशवादाची ओरड होते. आधुनिक राष्ट्रवाद स्वीकारलेल्या अमेरिकेसारख्या देशात विविध समाजांना एकत्र घेवून "अमेरिकन ड्रीम" ह्या त्यांच्या राष्ट्रवादाची मांडणी केली आहे. सहिष्णू परंपरेचा दावा करणाऱ्या भारतीयां कडून संविधानातला सेकुलर राष्ट्रवाद प्रत्यक्षात पाळला जावा ह्या साठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
Comments
Post a Comment