फँड्री- Fandry movie

फँड्री हा सिनेमा सामाजिक भड्वेगिरीवर जबरदस्त घाव आहे. वर्ग, वर्ण, जात सारख्या बिनडोक निकषावर समाज आणि त्या समाजाची सरंजामशाही आणि त्याच्या साठी लागणारी "फँड्री" म्हणजे हा सिनेमा.
नैसर्गिक प्रकाश सिनेमामधे फ्रेम वापरून 'मोंटाज' अगदी खेड़ वजा गावचा अनुभव देतो. माजिद मजीदीचा सिनेमातर बघत नाही ना असा विचार येवून जातो. सिनेमामधे कैमरा कलाकार अणि रूपक ह्या भोवती फिरतो.
डुक्कर हा प्राणी गटारात लोळणारा, संडासाजवळ फिरणारा, ह्या प्राण्याची तुलना उपेक्षित वर्गा बरोबर केलीतर दोघांमधे फार अंतर दिसत नाही.
सिनेमा चा काळ साध्यचा वाटतो. मंडल आयोगा नंतर दोन समाजामधे असलेली दरी अजुनचं स्पष्ट झाली. शहर केन्द्रित विकास आणि विकास केंद्रित माध्यम ह्या मुळे, दबलेल्या समाजाचे प्रश्न "मुख्य प्रवाहा" मधे आलेच नाहीत. मराठी सिनेमात, शहर ख़राब, गाव चांगलं असा जो भोळसट प्रकार दाखवणं सुरु होतं, त्याला हल्ली हल्ली जरा देवूळ, टिंग्या सारख्या सिनेमांनी धक्का लावला होता.
फँड्री हा सिनेमातलं खेड़ं, त्या मधला पाटिलकी दाखवणारा समाज आणि शहरा मधला इंग्रजी बोलून स्थानिक भाषा हेल काढून बोलनारया समाजाला झिडकारणारा समाज ह्यांची मानसिकता एकच आहे. अश्या प्रकारचे डावे विचार मांडताना तो कट्टरवाद होवू न देता आपला झगड़ा मानवतावादासाठी आहे हे विसरणाया समाजासाठी सुद्धा हा सिनेमा आहे.
शाहू, फुले, आंबेडकर ह्यांच्या तैलचित्रां समोरुन जाणारी नायक, मारलेलं आणि उलटं टांगलेलं डुक्कर ह्यांची वरात आणि तमाशा एन्जॉय करणारे गावकरी, हे रूपक अप्रतिम असलं तरी लाज वाटावी असाचं आहे. ह्या सिनेमा मधे जाणवलेली दूसरी गोष्ट म्हणजे उपेक्षित समाजच्या वेगाने बदलतोय त्या वेगाने तथाकथित सत्ताधारी वर्ग नाही. जम्याला तो अपृश्य आहे हे मान्य नाहि आणि ते करायची इच्छापण नाही. त्याच्या बापाने, कचरूने त्याचं दबलेपण मान्य केलं आहे आणि पोराने चकोरी सोडू नये अशी त्याचा अट्टहास आहे. जम्याला डुक्कर नाही तर काळी चिमणी मारायची आहे, वरच्या जाती मधली पोरगी पटवयाची आहे, टी शर्ट, जीन्स आणि लांब नाक करून शहरी दिसायचं आहे, पालखी मधे नाचून त्याच्या शालूला इम्प्रेस करायच आहे.
सिनेमात कैमरा आणि रूपकं सर्वात जास्त बोलतात. हा सिनेमा बघून अस्वस्थ होण जो पर्यन्त होत नाही तो पर्यंत शोषणकर्ता समाज त्याच्या गरजे साठी फँड्री समाजात तयार करत राहतील. ह्या फँड्री ऐकमेकना मारत राहतील. बघ्या समाज IPL सारखे मनोरंजन समजुन मजा घेइल, पैजा लावतील, निवडणुका जिंकतील, आयोग लावतील, फार फार तर बैनर लावून निषेध व्यक्त करतील. समस्या आणि शोषण सोडवण्या साठी आश्वासनं देवून नवे मसीहा आपली वोट बैंक तयार करत निर्माण होतील.
शेवटी काय विंदा करंदीकर म्हणतात तसं
देणार्याने देत जावे
घेनार्याने घेत जावे
घेता घेता देनार्याचे हात घ्यावे.

Comments