निचरा (लघुकथा) – निनाद खारकर


निचरा (लघुकथा) – निनाद खारकर
आज डम्पिंग ग्राउंडवर कचरा टाकायला पिऱ्या नेहमी पेक्षा उशीराच आला. तो काम करत असलेल्या सोसायटीत काल पूजा वगैरे असल्याने आज त्याला काम खुप होतं. अर्थात जास्त कामाचे त्याला पैसे मिळणार होते, त्यासाठी शाळेचे एक दोन तास बुडाले तर काय फरक पडतो असा त्याने विचार केला होता. तसंही शाळेतले कुबट वासाचे वर्ग, मरतुकडे पंखे, छिद्र पाडलेली बाकं ह्या पासून शक्यतितक्या लांब जायचा पिऱ्याचा प्रयत्न असायचा. त्यांच्या शाळेला मैदान नव्हतंच, मधल्या सुट्टीत सगळी पोर रस्त्यावर खेळायची, पोरी वर्गात बसून बडबड करायच्या. खेळायला मिळायचं म्हणून पिऱ्या शाळेत जायचा, बाकीचे अभ्यासाचे तास म्हणजे त्याला वैताग वाटायचा.
पिऱ्याच्या घरचे सगळे कुठे ना कुठे कामाला जायचे, त्याची आई चार घरी धुणी भांडी करायची, वडिल कोणत्यातरी ऑफिसात पिऊन म्हणून कामाला होते, त्यांच्या साहेबाच्या ओळखीने पिऱ्याचे दोन भाऊ कुठेतरी कामाला लागले होते. पिऱ्याला मात्र कोणत्याही ऑफिसमध्ये काम करण्यापेक्षा मुकादम व्हायचं होतं. रोज जमा केलेला कचरा पिऱ्या ज्या डम्पिंग ग्राउंड टाकायचा तिकडे मुकादम यायचा. सगळ्यांवर लक्ष ठेवायचा. युनिअनची काही कामं असली तर बाकीच्यांना सांगायचा. पिऱ्याला त्याचा हेवा वाटयचा. त्याच्या प्रमाणे आपल्याला अधिकार गाजवता यावेत असं त्याला नेहमी वाटायचं. मुकादमला विशेष काही काम न करता सुद्धा पुरेसे पैसे मिळतात याच त्याला अप्रुप होतं.
आज नेहमी प्रमाणे पिऱ्या कचरा घेवून डम्पिंग ग्राउंडवर पोहोचल. बरेच सफाई कामगार मुकादम भोवती कोंडाळ करून उभे होते. बर्याच लोकांच्या हातात हात मोजे, सुरक्षा साधन होती. कोणत्यातरी धर्मदाय संस्थेने सफाई कामगारामांना दान दिली होती. पिऱ्या त्याला काही मिळत का ते बघत होता, पण त्याच्या मापाचं काहिच मिळालं नाही. मुकादम त्या धर्मदाय संस्थेची माहिती सांगत होता, “जगतसेठ ह्यांनी त्यांच्या मातोश्री कोकिलाबेन ह्यांच्या नावाने आपल्याला ह्या उपकरणांची भेट दिली आहे. त्यांच्या सारखे दानशूर लोकं आहेत म्हणूनच आपल्या सारखे कामगार मानाने राहत आहेत.”
“काय थापा मारतोय मुकदम?”
पिऱ्याने एकदम चमकून बघितलं. त्याच्या बाजूचा एक इसम, दुसऱ्याशी बोलत होता.
“मुझे भी वही लग रहा है.” दुसरा हिंदीत बोलला.
“अरे ह्या मुकादमला जगतसेठची तारीफ करायला पैसे मिळाले आहेत वाटत. एरवी ह्या जगतसेठकडे काम करणाऱ्या लोकांना मुतारीतपण जावून देत नाही हा.”
“आप हो कैसे मालूम?” एकाने उर्दू मिश्रित हिंदीत प्रश्न विचारला
“मी होतो ना, त्याच्या कडे कामाला. लघवी करायला १५ मिनिट लांब चालत जावं लागायचं.”
“फिर ऐसी बात है तोः ये मुफ्त में चीझें क्यू बाट रहा है?”
“अरे नोटबंदीमुळे नगद संपवायची आहे त्याला असं ऐकल आहे आणि पुढच्या वर्षात नगरसेवकाची निवडणूक आहे, मुकादमने आपली मत त्याला कबुल केली आहेत म्हणून दानधर्म.”
पिऱ्या सगळ ऐकत उभा होतं. मुकादम बद्दल त्याच मन आता कडवट झालं पण आकर्षण कमी झालं नाही. तिकडून निघून आपल्या नेहमीच्या कचरा टाकण्याच्या जागेवर पिऱ्या निघाला. आज इकडे माणसं कमी होती. जगतसेठ आल्यामुळे, आशाळभुत नजरेने लोकं तिकडे गेले असतील असा विचार पिऱ्याच्या मनात आला. आपणही अश्याच आशाळभुत लोकांमध्ये होतो ह्याची त्याला लगेच आठवण झाली. त्याला त्याच्या कामाची लाज वाटायची नाही पण सहानुभूती बद्दल त्याला किळस होता. त्याच्या शाळेत आणि आजुबाजुला त्याच्याच आर्थिक गटातली मुलं असायची म्हणून कोणाकडून कधी सहानुभूती मिळण्याचा प्रश्न आलाच नाही. कामाच्या ठिकाणी असा प्रसंग आलाच तर दुर्लक्ष करायला पिऱ्या शिकला होता. आज पण त्याला मुकादामचा हेतू समजल्यावर त्याचा हिरमोड झाला होता. मुकादम म्हणजे त्याचा हिरो होता, मस्त पैकी ऐकीत भडक कपडे घालणारा, उलटी फिरवून टोपी डोक्यावर ठेवलेला, शर्ट थोडा बाहेर ठेवणारा, अर्धी जळती विडी तोंडात ठेवून बोलणारा, पिंगट डोळ्यांचा माणूस त्याला जाम आवडायचा. तो कधी त्याच्याशी बोलला नव्हता पण बाकीचे सफाई कामगार त्याला टरकून असायचे असं ऐकून होता. आज असा मुकादमला हांजी हांजी करताना बघून पिऱ्याला काहीतरी चुकल्या चुकल्या सारखं वाटत होत. ‘सगळ्या माणसांना कोणा पुढे तरी नमते घ्यावं लागत असेल का?’ असा विचार त्याच्या मनात आला.
तेवढ्यात “सगळ्यांनाचं कोणा पुढे तरी नमत घ्यावं लागतं फक्त कोणाच्या पुढ्यात वाकतो किती ह्या वरून माणसं ओळखावी.” असा आवाज पिऱ्याच्या कानावर पडला. तोच त्याच्या अंगारवर एक रंगीत कपटा उडत आला, पिऱ्याने तो झटकून टाकला.
त्याने चमकून मागे बघितलं तर एक दाढी वाढलेला, टक्कल पडलेला म्हातारा रंगीबेरंगी कपटे गोळा करत होता.
पिऱ्याने त्या माणसाला आधी बघितलं नव्हत, म्हातारी माणसं डम्पिंग ग्राउंडवर काम करायला फार येत नसतं. त्याला नवल वाटलं.
वाढलेली दाढी, खोल गेलेले डोळे आणि डोक्यावरचे विरळ झालेले केस असा अवतार त्या म्हाताऱ्या माणसाचा होता.
पिऱ्या त्या माणसा जवळ जावून बोलला, “तुम्ही आता काही बोलतात का? मी बहुतेक त्याच्या वरच मनात विचार करत होतो.”
ह्यावर तो माणूस फक्त गालातल्या गालात हसला आणि म्हणाला, “विचार.......विचारांचे असंख्य धागे म्हणजे मन, अश्या मनांचे धागे जो माणूस गोळा करतो त्याला एका बारक्या मुलाच्या मनात काय चालू असेल ह्याचा पत्ता नसावा का?”
तो माणूस काय बोलला हे पिऱ्याला काहिच समजलं नाही. आधी त्याने तसं दाखवून दिलं नाही पण उत्सुकता फारच ताणली. तो म्हातारा काही स्वतःहून बोलायला तयार राजी होताना दिसत नव्हता. शेवटी पिऱ्याने न राहवून विचारलं.
“काय हो आजोबा ? काय बोललात तुम्ही आता मला काहिच समजलं नाही?”
“मनाचे दरवाजे सगळ्यासाठी उघडतात असं थोडीच आहे? प्रत्येक मन वेगळे, त्यात उलटणारे तरंग वेगळे, तरंग उमटवणाऱ्या गोष्टी वेगळ्या, आपण फक्त अनुभव घेत राहायचं, शिकत राहायचं..
“अकथ कथा या मन की, कहै कबीर समुझाय
जो याको समझा परै, ताको काल ना खाय।“
“म्हणजे?” पिऱ्याने काहिच न समजल्या सारखा चेहरा करत विचारलं
“ह्या मनाच्या कथा अनंत आहेत. कबीर त्या समजावण्याचा प्रयत्न करतोय. ज्याला हे समजलं आहे त्याचं काळ सुद्धा काही वाकडं करू शकत नाही. आता तुझ्या मनातला विचार मला समजला कारण लोकांच्या मनातल्या विचारांचा निचरा करायचं काम मी करतो. ह्या रंगीबेरंगी चिंध्या आहेत त्या आहेत लोकांचे विचार. आठवणीतून पुसून टाकलेले, मागे पडलेले, सोडून दिलेले विचारांचे अगणित धागे. जगातली कोणतीही गोष्ट अपोआप नष्ट होत नाही हा निसर्ग नियम आहे म्हणून माझ्या सारखे यती हे काम अव्याहत करतात. हे विचारांचे धागे असेच राहिले तर फार त्रास देतात, भुतकाळात रमण्यासाठी अविरत आव्हान करतात, प्रकृतीची चाकं उलटी फिरली तर कलियुगाचा अंत कसा होईल? हे विश्व परत त्याच चक्रात अडकेल.”
पिऱ्याला तो माणूस वेडा वाटला. विचारांच्या चिंध्या काय, कलियुगाचा अंत काय त्याला वाटलं उगाच ह्याच्या नादी लागलो. पण नंतर विचार आला वेडा असला तरी त्याला आपल्या मनातले विचार समजले कसे? ह्याचा विचार करत पिऱ्या तिकडेच उभा राहिला.
“तुम्ही म्हणताय त्यावर विश्वास कसा ठेवायचा?”
म्हाताऱ्याने आपलं काम थांबवून त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाला,”नको ठेवुस, विश्वास नकोय, फक्त ऐकत जा, शिकत जा. काळ अनंत आहे. आपल्या विशाल निर्वात पोकळ्यामधून असंख्य जीव जंतू साठवून ठेवणाऱ्या काळात मी तुला काही थापा मारल्या तर, कोणाला त्याचं काय पडलंय. तुझ्याशी खोटं बोलून मला काय मिळणार?”
हे हि खरं होतं म्हणा, पिऱ्याकडे गोळ्या चोकलेट घायला पैसे नसायचे तर फसवण्याचा तर प्रश्नाचं नव्हता. मग हा म्हातारा मुलं पळवणाऱ्या टोळ्यांमधला असेल का? असा प्रश्न पिऱ्याच्या मनात आला.
तेवढ्यात तो म्हातारा म्हणालाच, “तुला पळवून कुठे घेवून जावू? चार दिशा हेच माझं घर, आभाळ म्हणजे माझी रजई. अखंड विश्वात फिरून आठवणींचा निचरा करणाऱ्या मला तुला पळवून नेवून माझी अडचण वाढवायची नाही रे बाबा!”
आता मात्र पिऱ्याला म्हातारयाची भीती वाटायला लागली, आधी इथे कधी न दिसलेला माणूस इतका वेळ आपल्याशी गप्पा मारतोय आणि बाकी कोणी बघत नाही न हे पिऱ्याने बघून घेतलं.
“मी हा असाच आहे.” म्हातारा त्याच्याच तंद्रीत म्हणाला “लोकांच्या विचारांचा निचरा करता करता मला माझा शेवट दिसतो आहे. किती काळ मी वणवण फिरलो, असंख्य भावनांनी ओथंबलेल्या विचारांचा निचरा केला. त्यात माझ्या कोणत्याच इच्छा ठेवल्या आहेत पण आता माझी जाण्याची वेळ झाली. आता पुढचं काम पुढचा येती करेल.”
“पुढचा माणूस? तो कोण” पिर्याने उत्सुकतेने विचारलं
“हे विचारांचे तुकडे त्यांना कोणा कडून विसर्जित व्हायचं ते स्वतः ठरवतात. ज्याच्या कडून व्हायचं असेल त्याच्या जवळ उडून जातात.”
पिऱ्याच्या डोक्यात आता लख्ख प्रकाश पडला होता, तो जवळ जवळ ओरडलाच,”मगाशी एक कपटा उडून माझ्या अंगावर आलेला?”
म्हातारा फक्त मंद हसत होता, निर्विकारपणे. हळूहळू एक-एक कपटे पिऱ्या जवळ जमा झाले, त्या म्हाताऱ्या जवळचे कपटे आता हळूहळू पिऱ्या जवळ येत होते. असंख्य आठवणींचा निचरा करायला त्यांना आता नवीन यती मिळाला होता.
– निनाद खारकर

Comments

  1. छान लिखाण जमून आले

    ReplyDelete
  2. छान लिहिलय
    विचार करायला लागेल असे
    लिहित रहा

    ReplyDelete
  3. कथेची मध्यवर्ती कल्पना इंटरेस्टींग आहे.

    ReplyDelete

Post a Comment